कोल्हापूरची ‘चौकट’ गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार*

कोल्हापूरची ‘चौकट’ गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार*

कोल्हापूरच्या कलाकारांनी साकारलेली ‘चौकट’ ही शॉर्टफिल्म गोवा येथे 20 ते29 नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या 47 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात IFFI (इफ्फी)झळकणार आहे. ‘चौकट’फिल्मच्या ‘इफ्फी’तील निवडीमुळे कोल्हापूरची कलापूर ही ओळख पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी गोव्यात आयोजित केला जाणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगभरातल्या सिनेरसिकांसाठी पर्वणी समजला जातो. देश-विदेशातील आशयघन सिनेमे पाहायला मिळत असल्याने या महोत्सवाला सिनेसृष्टीतील कलाकारांसह चित्रपटप्रेमी दरवर्षी मोठी गर्दी करत असतात. या महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागात कोल्हापूरच्या कलाकारांनी साकारलेल्या ‘चौकट’ या लघुचित्रपटाची निवड झाली आहे.^

अ‍ॅडव्हेंचर्स प्रॉडक्शनची निर्मिती असलेला आणि उमेश बगाडे लिखित व दिग्दर्शित ‘चौकट’ या लघुपटातून दगडाच्या मूर्तीत सर्वांना देव दिसतोच, तसा माणसातही माणूस दिसलाच पाहिजे हा संदेश देण्यात आला आहे. या शॉर्टफिल्मच्या कलात्मक व तांत्रिक बाजू कोल्हापूरच्याच कलाकार व तंत्रज्ञांनी सांभाळल्या आहेत.

उमेश बगाडे या कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाने यापूर्वी विविध जाहिरातपटांची निर्मिती केली असून, टीव्ही चॅनल्सवरील विविध मालिकांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्य केले आहे. या शॉर्टफिल्ममध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागातील प्रा. विजय पवार, अभिनेत्री व नृत्यांगना कोमल आपके यांनी भूमिका साकारल्या आहेत. अभिषेक शेटे याने छायांकन केले असून, उत्कृष्ट छायांकनासाठी त्याला आत्तापर्यंत 4 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलन,ऐश्‍वर्य मालगावे यांनी पार्श्‍वसंगीत, सागर ढेकणे व अभिषेक संत यांनी कला दिग्दर्शन, अमर कुलकर्णी याने रंगभूषा व वेशभूषा, जाई दिघे हिने उपशीर्षके अशा जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. तसेच संदीप गावडे,विजय कुलकर्णी, अक्षय क्षीरसागर, पुष्कराज ठक्कर,सुमित सासने यांचेही या फिल्मसाठी विशेष सहकार्य लाभले आहे.

या शॉर्टफिल्मबद्दल अधिक माहिती देताना लेखक-दिग्दर्शक उमेश बगाडे यांनी सांगितले, की छायांकन ही या शॉर्टफिल्मची जमेची बाजू आहे. अमराठी लोक जेव्हा ही फिल्म बघतात, तेव्हा उपशीर्षक न वाचताही या मराठी भाषिक चित्रपटाचा आशय त्यांना सहज उमगलतो. विशेष म्हणजे या शॉर्टफिल्ममध्ये काम केलेले कलाकार आणि तांत्रिक बाजू सांभाळणार्‍या सर्व कलाकारांनी कोणतेही मानधन न घेता काम केले आहे. या शॉर्टफिल्मची भारताच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाल्यामुळे आमची मान अभिमानाने उंचावली आहे.

*‘चौकट’ला अनेक पुरस्कार*

‘चौकट’ या मराठी शॉर्टफिल्मची या अगोदर अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाली आहे. इटली येथील रिव्हर टू रिव्हर फ्लोरान्स इंडियन फिल्म फेस्टिव्हल, 22वा कलकत्ता इंटर्नशनल फिल्म फेस्टिवल अशा मानाच्या फेस्टिव्हल्स मध्ये चौकट लवकरच झळकणार आहे… चेन्नई येथील चेनीम फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म,पॉकेट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऑडिएन्स चॉईस बेस्ट फिल्म, हरियाना फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म,दिल्ली येथील वुडपीकर बेस्ट फिल्म आदी प्रतिष्ठेचे पुरस्कार या मराठमोळ्या फिल्मने पटकावले आहेत.